वाहनचालकांना त्रास
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्य मार्ग रस्त्यावरील साईमंदिर येथील आरसीसी काँक्रिटीकरणाचे काम महिन्यापासून थांबले आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा एक भाग पूर्ण झाला असून, दुसर्या भागातील रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र, रस्त्याचे काम बंद असल्याने स्थानिक वाहनचालकांना एकेरी रस्त्याने प्रवास करताना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली होती. त्या निधीमधून नेरळ साई मंदिर येथून पुढे कळंब कंदील 900 मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण आणि पुढील तीन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण केले जाणार होते. नोव्हेंबर 2021 पासून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले. त्यानंतर साई मंदिर येथून धामोते गावाच्या अलीकडील रस्त्याचा एक भाग काँक्रिटीकरण करण्यात आला आहे. त्यानंतर हा रस्ता महिन्यापूर्वी वाहतुकीस खुलादेखील झाला आहे. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचा दुसरा भाग काँक्रिटीकरण करण्यासाठी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यावेळी नव्याने बांधलेल्या काँक्रिटीच्या रस्त्यावरून वाहतूक देखील सुरु झाली आहे. परंतु, त्या तीन मीटरच्या रस्त्याने दोन वाहने जाताना अडचणी येत असून, वाहतूक कोंडी आणि धोकादायक अवस्थेत प्रवास वाहनचालक यांना करावा लागत आहे.
कोट..
आम्ही रास्ता रोको केल्यानंतर रस्त्याचे काम सुरु झाले, पण आता ठेकेदाराने पुन्हा काम थांबवले असून, स्थानिक वाहनचालकांनी कोंडी केली आहे. ठेकेदाराने सुरु असलेली लग्नसराई लक्षात घेऊन तात्काळ रस्त्याचे काँक्रिटीकरांचे काम सुरु करावे आणि वाहनचालक यांना दिलासा द्यावा.
- सतीश कालेकर, मनसे कार्यकर्ता
आपण तात्काळ संबंधित रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराला रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सूचना दिली आहे. काँक्रिटीचे काम सुरु करून ज्या भागातील डांबरीकरणाचे काम बाकी असेल, तेदेखील संपण्याच्या सूचना केल्या आहेत. - संजीव वानखेडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग