महसूल विभाग व पालिकेचा कानाडोळा
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली नगरपालिका हद्दीत सुभाष नगर व काजूवाडी या दोन रहिवासी वस्ती यापूर्वीच दरडग्रस्त व धोकादायक रहिवासी भाग म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या भागाच्या सुरक्षेसाठी भूगर्भ तज्ञांनी सुचविलेल्या आवश्यक उपाययोजना अद्याप प्रलंबित आहेत. दुसरीकडे विणानगरला लागून तिसरी दरडग्रस्त वस्ती दुर्लक्षित आहे. या भागात नवीन रहिवासी वस्ती निर्माण होण्यासाठी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक डोंगर पोखरून भरमसाठ माती उतखलन करून डोंगर नाहीसा करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात तक्रारी करूनही नगरपालिका व महसूल प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
विणानगरला लागून असलेल्या डोंगरवरील पठार मागील दीड वर्षांत टप्याटप्याने पूर्ण पणे नाहीसे करून डोंगराचा धोकादायक सरळ उभा कडा तयार करण्यात येत आहे. त्या खाली सपाटीकरणं करून रहिवासी संकुले व बंगले आदी नवीन रहिवासी वस्ती निर्माण करण्यासाठीची पूर्व तयारी सुरू आहे. दुसरीकडे या माती उतखलनामुळे डोंगरवरील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलणार असून, याचा मोठा फटका पावसाळी मोसमात विणानगर व त्या खालील अन्य रहिवासी भागाला दरड व पूर सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात स्थानिक रहिवासी, तत्कालीन नगरसेवक व विणानगर रहिवासी संघाने नगरपालिका व तालुका महसूल विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. तहसीलदार आयुब तांबोळी व मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन संभाव्य धोका बाबत सूचित करून बेसुमार माती उतखलन थांबविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंतीही केली आहे. त्यानुसार नगरपालिका अधिकारी व महसूल विभागाचे अधिकार्यांनी पहाणीही केली व त्यानंतर काही दिवस येथील माती उतखलन थांबविण्यात आले होते. परंतु वर्तमान स्थितीत या डोंगरावर पुन्हा जेसीबी व अन्य आधुनिक यंत्र सामुग्री लावून जोरदार माती उतखलन सुरू आहे.