| रत्नागिरी | प्रतिनिधी |
कोकण रेल्वे पाठोपाठ जलवाहतूक मार्गे राज्य शासनाची बहुचर्चित रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या जलवाहतूक रो-रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून, पहिली रो-रो सेवा देणारी बोट रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरात दुपारी तीन वाजता दाखल झाली. या रो-रो सेवेचा जिल्हा प्रशासन व जयगड ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
कोकणात येणाऱ्या मुंबईवासी कोकणकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी केंद्रीय शिपींग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या बंदर विभागाने या जलवाहतूक सेवेस अंतिम मंजूरी दिली आहे. कोकणात गणेशोत्सव आणि होळी यासारख्या सणांसाठी दरवर्षी कोकणकर गावी कोकणात येत असतात. अशा कोकणकरांचा प्रवास अधिक सुखकर व चांगला होण्यासाठी राज्य शासनाने मुंबई ते जयगड, रत्नागिरी आणि मुंबई ते विजयदुर्ग, सिंधुदूर्ग रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जलद गतीने पहिली रो-रो सेवा देणारी बोट दुपारी 3 वाजता रत्नागिरीच्या जयगड बंदरात दाखल झाली. या रो-रो जलवाहतुकीमुळे कोकणवासीयांना तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या मत्स्य व बंदर विभागाने या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण 147 परवानग्या मिळविल्यानंतर ही रो-रो सेवा कोकणकरांच्या सेवेला सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते रत्नागिरी जयगड तीन तास तर भाऊचा धक्का ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग पाच तास प्रवास करत ही रो-रो सेवा देणारी बोट पोहचणार आहे. 25 नॉट्स स्पीडची ही एम टू एम नावाची रो-रो बोट जयगड बंदरात दाखल होताच ग्रामस्थांनी ही बोट पाहण्यास मोठी गर्दी केली होती. कोकणकरांच्या सेवेत सुरु करण्यात आलेल्या या रो-रो बोटमध्ये 552 इकोनॉमी, 44 प्रिमीयम इकोनॉमी, 48 बिझनेस व 12 फस्ट क्लास असे वर्ग करण्यात आले आहेत. या बोटी मध्ये 50 चारचाकी, 30 दुचाकी वाहून नेण्याची क्षमता आहे.







