अखेर प्रशासनाला जाग; आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी

ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश; ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा व वनविभागाकडून पाहणी

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानच्या डोंगरात वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. प्रशासकीय मान्यता मिळून त्यासाठी निधीची तरतूदही केली होती, मात्र रस्त्याच्या कामाला मुहूर्तच लागत नाही. दरम्यान, सर्पदंश झालेल्या महिलेला रस्त्याअभावी झोळीतून रुग्णालयात नेताना उपचारास विलंब झाल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे आक्रमक होत आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी नेरळ-माथेरान घाटरस्ता रोखण्याचा निर्धार करताच प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी ठेकेदाराला रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 12 आदिवासी वाड्यांकडे जाणाऱ्या मार्गांचे निरीक्षण करण्यात आल्याने लवकरच या वाड्यांवर जाण्यासाठी रस्ते तयार केले जाणार आहेत.

माथेरानमध्ये वनविभागाच्या दळी भूखंडावर 100 वर्षांपूर्वी वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कच्च्या रस्त्यावरील माती वाहून गेली आहे. 2005 मध्ये महापुरात पायवाटही वाहून गेल्याने आदिवासी बांधवांनी तब्बल आठ वर्षे श्रमदान करून कच्च्या स्वरूपाचा रस्ता तयार केला. मात्र, आजही आजारी रुग्णाला झोळीतून रुग्णालयात न्यावे लागते.

आदिवासी वाड्यांना रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको केले आहेत.बेकरेवाडी, किरवलीवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, मण्याचा माळ यांसह 12 वाड्या रस्त्याविना संघर्षमय जीवन जगत आहेत. जानेवारी 2024 मध्ये ऑनलाईन भूमिपूजन झाले होते. मात्र, सहा महिने झाले तरी कामाला सुरुवात झाली नाही. दरम्यान, सर्पदंश झालेल्या विठाबाई सांबारी यांचा झोळीतून रुग्णालयात नेताना, उपचारास विलंब झाल्याने मृत्यू झाल्याची घटना 15 जुलै रोजी घडली. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी 27 जुलै माथेरान घाटमार्ग बंद करण्याचा इशारा दिला होता.

याबाबतचे वृत्त कृषीवलमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाला खडबडून जाग आली. ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेचे उपअभियंता रामराव चव्हाण व कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर यांनी ग्रामस्थांबरोबर बैठक घेत ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्काळ रस्त्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आल्याने आदिवासी बांधवांनी आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगितले. रस्त्याच्या मागणीसाठी माथेरानच्या डोंगरात वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांनी 9 मार्च 2024 रोजी नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर आंदोलन केले होते. त्या वेळी आदिवासींच्या भावना समजून घेत, तसेच खोळंबलेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी मध्यस्ती केली होती. त्यानंतरही त्यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला.

आदिवासी वाडीतील रस्त्यांचे काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. तसेच, आदिवासी बांधवांनाही आंदोलन न करण्याबाबत विनंती केली होती. येथील भौगोलिक परिस्थितीनुसार रस्ता मजबूत करण्याकडे आमचा भर राहील, त्यासाठी स्वतः जातीने कामावर लक्ष ठेवणार आहे.

रामराव चव्हाण,
उपअभियंता,
ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा

रस्त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. मात्र, आता आशेचा किरण दिसत आहे. प्रशासनाने आम्हाला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, तसेच काम लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार रस्त्याचे सर्वेक्षणही सुरू केले आहे. आम्ही आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत, मात्र कामात पुन्हा कुचराई झाली तर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

जैतू पारधी,
अध्यक्ष,
आदिवासी जनजागृती विकास संघटना, कर्जत

मूलभूत सुविधांसाठी आम्ही संघर्ष करीत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली. जग चंद्रावर पोहोचले तरी आमच्या 12 वाड्यांचा प्रश्न अद्याप सुटत नाही. एखाद्या रुग्णाला दवाखान्यात न्यायचे असले तर झोळी करून न्यावे लागते. रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. निधीही उपलब्ध झाला असून अद्याप रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. आता आंदोलन स्थगित केले असले तरी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

गणेश पारधी,
ग्रामस्थ
Exit mobile version