अखेर सिडको प्रशासन नरमले

शेतकऱ्यांना सोमवारी चर्चेचे निमंत्रण

| उरण | वार्ताहर |

प्रलंबित साडेबारा टक्क्यांच्या मागणीसाठी उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाचे काम बंद करण्याचा इशारा देताच सिडकोने जासई ग्रामस्थांना सोमवारी (दि.9) चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. 22 सप्टेंबर 2022 ला सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे झालेल्या बैठकीत जासई ग्रामस्थांना सहा महिन्यांत साडेबारा टक्के भूखंड वाटपाचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी न झाल्याने जासई ग्रामस्थांनी सिडकोविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याची दखल घेत पुन्हा एकदा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सोमवारी चर्चेसाठी बोलवले असल्याची माहिती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी दिली आहे.

जासईच्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाच्या मागणीसाठी उरण-नेरुळ मार्गावरील गव्हाण स्थानकाचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. जासई येथील 37 शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने रेल्वेसाठी 2005 ला संपादित केल्या आहेत. त्याच्या मोबदल्यात दिले जाणारे 70 गुंठे साडेबारा टक्के भूखंड सिडकोच्या मुख्य भूमी व भूमापन अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही न दिल्याने जासई येथील शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे.

यासंदर्भात जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी सिडकोविरोधात आंदोलन उभारण्याचे नियोजन केले. त्यांची दखल सिडकोने घेऊन जासई ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्तांना सोमवारी विचारविनिमय करण्यासाठी बैठकीत करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली आहे.

Exit mobile version