रायगड पोलिसांचे यशस्वी सर्च ऑपरेशन
| रायगड | प्रतिनिधी |
मुरुड-कोर्लई किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या संशयास्पद पाकिस्तानी बोयाचा अखेर शोध लागला आहे. रायगड पोलिसांनी राबवलेल्या व्यापक सर्च ऑपरेशनदरम्यान, हा बोया रेवदंडा-आंग्रेनगर किनाऱ्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आढळून आला. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली असून, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या शोध मोहिमेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
ही घटना ६ जुलै रोजी रात्री घडली होती. कोर्लई किल्ल्याजवळ ‘मुकादर बोया 99 (एमएमएसआय: 463800411) नावाची एक बोट आढळली होती. प्रथमदर्शनी ती बोट संशयास्पद वाटल्याने खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासानुसार ही बोट पाकिस्तानातून आलेली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल, नौदल व केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून स्थानिक पोलिसांना सतर्क केले.
पोलिसांच्या तपासात पुढे स्पष्ट झाले की, ही बोट नसून ती एक बोया म्हणजेच समुद्रातील मार्गदर्शक चिन्ह आहे. मात्र, बोया बेपत्ता झाल्याने आणि त्याचा पत्ता लागत नसल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली होती. त्यामुळे पाच दिवस सातत्याने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर रायगड पोलिसांच्या दक्षतेमुळे हा बोया रेवदंडा परिसरात आढळून आला.
या मोहिमेत तटरक्षक दल, नौदल व स्थानिक पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे सर्च व कोंबिंग ऑपरेशन राबवत परिस्थितीवर बारीक नजर ठेवली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील समुद्री सुरक्षेचा पुनराव्हा घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, समुद्रमार्गे घडणाऱ्या संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, सॉफ्टवेअर व स्थानिक यंत्रणांचा समन्वय अधिक बळकट करणे काळाची गरज आहे. यासारख्या घटनांतून सतर्कतेचा इशारा मिळत असून, किनारपट्टी सुरक्षा यंत्रणांची सज्जता टिकवणे अत्यावश्यक बनले आहे.
