अॅड. राकेश पाटील यांच्या अर्जाची जि.प.कडून दखल
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणार्या अलिबाग तालुक्यातील फणसापूर येथून सुरू होणारा व जवळपास चौल-गायचोळे येथे संपणारा अंदाजे 07 किलोमीटरचा रस्ता असून, सदरच्या रस्त्याचे सुमारे 20 वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याला डांबरच माहिती नव्हती, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. सदरच्या रस्त्याचे तात्काळ नूतनीकरण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बास्टेवाड यांना निवेदन दिले होते.
सदरच्या निवेदनामध्ये रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. या रस्त्यावरून कुदे, सुडकोली, नवखार, भागवाडी, भोनंग, नवघर, महान, मोरोंडे, उमटे, रामराज, रामराज विभागातील 7 ते 8 अदिवासी वाड्या, बोरघर, ताजपूर, मोरखोल, भिलजी, फणसापूर, बापळे, दिवी पारंगी, चिंचोटी, फुडेवाडी, चौल कातळपाडा, वळवळी, वळवळी आदिवासीवाडी सुमारे 23 गावांतील नागरिकांचा रोजच्या रहदारीचा हा रस्ता असून, वरील 23 गावांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी रेवदंडा कॉलेजला याच रस्त्याने जाणारे आहेत. चौल व रेवदंडा या ऐतिहासिक शहरांना जोडणारा कमी वेळ लागणारा रस्ता आहे. आग्राव कोळीवाड्यातील कोळी महिला मासे विक्रीसाठी ग्रामीण भागात येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. मात्र, तो रस्ता ही शेवटच्या घटिका मोजत आहे. सदरच्या रस्त्यावरून 23 गावांतील नागरिक हे ग्रामीण भागांतील असून, हातावर पोट भरणारे आहेत. शेती आणि मासेमारी तसेच दुग्ध व्यवसाय करणारे येथील नागरिक असून, या विभागातील नागरिकांसाठी शेती, शिक्षणासाठी जवळची बाजारपेठ म्हणून चौल, रेवदंड्याची बाजारपेठ आहे.
अॅड. राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्राची रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल देवांग यांनी रस्त्याची दयनीय अवस्था पाहून जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता (प्रमाग्रासयो) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था रायगड अलिबाग यांना पत्र देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फणसापूर येथून सुरू होणारा व जवळपास चौल-गायचोळे येथे संपणार्या रस्त्याचा वनवास संपण्याचे चित्र दिसत असल्याचे अॅड. राकेश पाटील यांनी मत व्यक्त केले.