अखेर राज्यपाल कोश्यारी यांचा राष्ट्रपतींनी राजीनामा स्विकारला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी आता नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोश्यारी यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले होते.

Exit mobile version