सीएफटीआयला दिली प्रशासनाने परवानगी; नागरिकांना मिळणार शुध्द पाणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला (सीएफटीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे आता धरणातील गाळ काढून अलिबाग तालुक्यातील तब्बल 44 गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा होण्यास मदत मिळणार आहे.
उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील 44 गावातील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत होता. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तसेच, येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्याने यातून मार्ग काढवा अशी विनंती उमटे धरण परिसरातील स्थानिकांनी केली होती. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक भुमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांची 29 एप्रिल रोजी भेट घेतली होती. नागरिकांना शुध्द पाणी द्या, शासनामार्फत धरणातील गाळ काढा अन्यथा आम्हाला तो गाळ काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला आज यश आले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड आणि कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला (सीएफटीआय) त्यांच्या सीएसआर फंडातून 14 मे रोजीच्या पत्रान्वये परवानगी दिली आहे.
गाळ काढण्यासाठी परवानगी मिळावी. यासाठी गेल्या महिनाभरापासून शेकापमार्फत पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर त्याला यश आले आहे. संबंधीत संस्थेमार्फत लवकरच गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पोकलेन, जेसीबी, ट्रक यासह अन्य यंत्रसामुग्री प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील उपलब्ध करुन देणार आहेत. परिसरातील 44 गावांनी श्रमदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच आवश्यक असणारी यंत्रसामुग्री उपलब्ध करुन श्रमदान करावे, असे आवाहन उमटे धरण संघर्ष ग्रुपने केली आहे. गेल्या काही वर्षापासून प्रशासनाने याबाबत कानाडोळा केला होता, त्यामुळे जनतेला अशुध्द पाणी प्यावे लागत होते. आता मात्र, शेकापने केलेल्या पाठपुराव्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. शेकापच्या जनतेप्रती असलेल्या आत्मीयतेबाबत आम्ही अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील यांचे आभार व्यक्त करतो, असे ॲड. राकेश पाटील, ॲड. कौस्तुभ पुनकर यांनी सांगितले.
उमटे धरणातून अशुध्द पाण्याचा पुरवठा होत होता. आता गाळ काढण्याला परवानगी मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यानंतरही गाळ काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. ग्रामस्थांना कायमस्वरुपी शुध्द पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. याबाबत प्रशासन, उमटे धरण परिसरातील ग्रामस्थ, उमटे धरण संघर्ष ग्रुप, ॲड. राकेश पाटील, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यासह अन्य सर्वांचे आभार व्यक्त करते.
चित्रलेखा पाटील,
शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख
शेकाप नेहमीच सामाजिक उपक्रमात पुढे राहीला आहे. उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न बऱ्याच कालावधीपासून प्रशासनामार्फत रेंगाळला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील नागरिकांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. गाळ काढण्यासाठी मी पोकलेन, जेसीबी यासह अन्य आवश्यक साहित्य देत आहे. तालुक्यातील अन्य व्यावसायिकांनी देखील या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे.
प्रशांत नाईक,
माजी नगराध्यक्ष अलिबाग