| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेच्या परवाना विभागाकडून पालिका हद्दीत जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमण्यात आलेली एजन्सी पालिकेला वरचढ ठरत असल्याचे वृत्त गुरुवारी (ता.30) दैनिक कृषीवलच्या अंकात छापून आले होते. कृषीवलच्या वृत्तानंतर कळंबोली सर्कल ते जेएनपीटी महामार्गावरील कामोठे एमजीएम रुग्णालयाशेजारील सिडकोच्या भूखंडावर रात्रीच्या अंधारात उभारण्यात आलेला जाहिरात फलकाचा सांगाडा अखेर हटवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कृषीवलच्या दणक्यामुळे सांगाडा हटवण्यात आल्याने कृषीवलच्या वृत्ताची दखल प्रशासनाला घेणे भाग पडल्याची चर्चा परिसरात आहे.
पनवेल पालिकेच्या जाहिरात धोरणानुसार पालिका हद्दीत जाहिरात फलक उभारण्यासाठी एका खासगी जाहिरात एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत पालिका हद्दीत जवळपास सहा हजार ठिकाणी विविध आकारांतील जाहिरात फलक उभारण्यात येत आहेत. पालिकेने आखून दिलेल्या नियम आणि शर्थीनुसारच संबंधित एजन्सीने जाहिरात फलक उभारणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेने नेमलेली एजन्सी पालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवून पालिका हद्दीत विविध ठिकाणी जाहिरात फलक उभारत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत असून, पालिका प्रशासनाच्या परवाना विभागाच्या अधिकार्यांना वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे.