तळा तालुका क्रिकेट असोसिएशनचा मदतीचा हात
| तळा | वार्ताहर |
तळा तालुका क्रिकेट असोसिएशनने दुर्धर आजाराने ग्रस्त असणार्या लहानग्याच्या उपचारासाठी रोख स्वरुपाची आर्थिक मदत करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मदतीमुळे कुटुंबियांचा आर्थिक भार हलका झाला आहे.
सार्थक नास्कर या लहानग्याच्या उपचारासाठी लाख मोलाची मदत केली आहे. तळा तालुक्यातील वानस्ते येथील सार्थक धनाजी नास्कर या लहान मुलाला ब्रेन ट्युमरने ग्रासले आहे. त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सार्थकच्या उपचारासाठी पैसे कसे उभे करावे या विवंचनेत ते होते. याबाबतची माहिती तळा तालुका क्रिकेट असोसिएशनला समजल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सदस्यांच्या सहकार्याने पैसे गोळा करून दोन लाख पन्नास हजार रुपये धनाजी नास्कर यांच्या खात्यावर जमा केले. तसेच उर्वरित तीस हजार रुपये रोख स्वरूपात असोसिएशनच्या कार्यकारिणीने हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करीत एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांची मदत सार्थकच्या उपचारासाठी केली.
तळा तालुका क्रिकेट असोसिएशन ही रजिस्टर संस्था असून, क्रीडा व्यतिरिक्त कला, सामाजिक व शैक्षणिक बाबतीतसुद्धा मुंबई व तळा तालुक्यात जोमाने कार्य करीत आहे. त्यांनी केलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.