| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील शिवधन पतसंस्थेच्या सभासद कल्याण निधीतून म्हात्रे कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. मात्र म्हात्रे कुटुंबियांचे प्रमुख तथा शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश बाबुराव म्हात्रे यांनी मोठेभोम येथे उभारण्यात येणाऱ्या शिव पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी सदरची रक्कम शिवस्मारक कमिटीकडे देण्याचे जाहीर केले.
शिवधन पतसंस्थेच्या सभासदाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना शिवधन पतसंस्थेकडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पतसंस्थेच्या आर्थिक सहाय्य करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार शिवधन पतसंस्थेच्या सभासद सारिका गणेश म्हात्रे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या नियमानुसार त्यांच्या वारसांना शिवधन पतसंस्थेकडून ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. मात्र त्यांनी ही आर्थिक मदत सारिका म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शिव पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी देऊ केली आहे. याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष गजानन वशेणीकर, संचालक अशोक फोफेरकर, विलास ठाकूर, अनंत पाटील, दत्तात्रेय म्हात्रे, दीपक पाटील, सुभाष ठाकूर, धनाजी म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकार, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.