सात मेंढ्या, दोन शेळ्या दगावल्या
| खोपोली | प्रतिनिधी |
दरवर्षीप्रमाणे यंदाही मेंढपाळ आपल्या कळपातील मेंढ्या घेऊन कोकणाकडे निघाले असताना कळपातील मेंढ्या मरू लागल्याने मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मेंढपाळ खंडू कोकरे पुणे-केडगाव चौफुले येथून आले असून, चार दिवसांपूर्वीच ते खोपोलीत दाखल झाले आहेत. त्यांच्या कळपातील सात मेंढ्या व दोन शेळ्या खोपोली येथे मुक्कामाच्या ठिकाणी मरण पावल्या. यामुळे मेंढपाळावर आर्थिक संकट ओढावले असून, ते हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, याबाबत वावोशी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधला. तेथील डॉ. नेत्रा आस्वार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासणी करण्यास सुरुवात करेपर्यंत यातील 7 मेंढ्या व 2 शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. डॉ.नेत्रा आस्वार यांनी खालापूर तालुका पशुधन विकास अधिकारी रोहिणी गायकवाड यांच्याशी संपर्क करून तात्काळ अन्य डॉक्टरांची मदत मागवून उपचार करायला सुरुवात केली. या दरम्यान चार ते पाच मेंढ्या मृत पावल्या. मात्र डॉक्टरांना ज्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले, त्या मेंढ्या मात्र बचावल्याने कोकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मेंढ्या अचानकपणे मरण पावल्याने खळबळ माजली. हे समजल्यावर खालापूर तालुका पशुधन विकास अधिकारी रोहिणी गायकवाड यांनी तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह वनवठे येथे प्रस्थान करून आजारी मेंढ्यांना उपचार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या समवेत डॉ.नेत्रा आस्वार, डॉ.कोकरे, डॉ.काळे, डॉ. राजेंद्र गायकवाड, सहाय्यक म्हापणकर यांच्यासह मदतीसाठी आलेले रासपचे कार्यकर्ते भगवान ढेबे, संपत ढेबे,विजय ढेबे, रविंद्र बोडेकर, अरूण मोरे यांच्या मदतीने आजारी मेंढ्यांना उपचार करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याने काही मेंढ्या वाचल्याचे दिसून येत आहे.
आजारांचे नक्की निदान लगेच समजू शकत नाही. मात्र, आम्ही जे प्रयत्न करीत आहोत, त्या प्रयत्नाला यश येत आहे. मृत पावलेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर आपणास नेमके काय झाले आहे ते समजेल, तोपर्यंत आमची संपूर्ण टीम व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आजारी मेंढ्या वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
डॉ. रोहिणी गायकवाड, तालुका पशुधन विकास अधिकारी, खालापूर
अचानकपणे मृत झालेल्या मेंढ्या म्हणजे मेंढपाळावर आलेले हे अस्मानी संकट म्हणावे लागेल. या संकटात स्थानिक लोकांनी दाखविलेली सहानुभूती व संकटावर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कोकरे यांना धीर मिळाला आहे. पशुवैधकीय अधिकारी यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.
भगवान ढेबे, रासप कोकण विभाग अध्यक्ष तथा कार्यकारिणी सदस्य







