। पुणे । प्रतिनिधी ।
रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश दिनकर राजगुरु (50, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार चिंचवड परिसरात राहत असून त्यांची आरोपी राजगुरु याच्याशी ओळख झाली होती. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी त्याने तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर तक्रारदाराने राजगुरुला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले. लाखो रुपये देऊनही राजगुरुने नोकरी लावली नाही. त्यानंतर राजगुरुने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भेटायला बोलावले. तसेच, तक्रारदाराच्या ईमेलवर त्याने रेल्वेत आरोग्य निरीक्षकपदावर नोकरी मिळाल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले. मात्र, चौकशीत नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.