। पालघर । प्रतिनिधी ।
बँकेतून निवृत्त झालेल्या एका वृध्द महिलेला सायबर चोरांनी तब्बल 28 लाखांचा गंडा घातला आहे. पीडित महिला 76 वर्षांच्या असून त्या मुंबईच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरात रहातात. 23 जुलै रोजी त्यांना एक फोन आला. यात मी रिझर्व बँक ऑफ इंडियामधून बोलत असून तुमच्या नावाने घेतलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला असल्याचे त्याने सांगितले. तसेच, तुमच्यावर हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. यानंतर पीडित महिलेला हैद्राबाद पोलिसांच्या नावाने व्हिडिओ कॉल आला आणि फिर्यादी यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच, यातून मार्ग काढण्यासाठी पैशांची मागणी केली. यावेळी पीडित महिला या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या आणि चार वेळा वांद्रे येथील आपल्या बँकेत जाऊन एकूण 28 लाख रुपये या सायबर भामट्यांना पाठवले. यानंतर भामट्यांनी फिर्यादी महिलेचे शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले असता या महिलेला संशय आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.