। पालघर । प्रतिनिधी ।
एकापाठोपाठ एक आर्थिक घोटाळे समोर येत असतानाच आता बोईसरच्या दिपांकर इन्वेस्टमेंट नावाच्या कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे बुडविल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जास्त व्याज आणि दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या ‘दीपाकर फिनकॅप इन्व्हेसमेंट’ विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कंपनीचे बोईसर येथे कार्यालय असून कंपनीने नागरिकांना त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर मासिक दहा ते बारा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत शेकडो कोटी रुपये जमा केले होते. सुरुवातीला एक ते दोन महिने गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच, कंपनीने नेमलेल्या विक्री प्रतिनिधींच्या मदतीने हजारो ग्राहकांकडून शेकडो कोटींची गुंतवणूक या कंपनीत करण्यात आली होती. मात्र, कालांतराने कंपनीकडून कराराप्रमाणे परतावा देण्यास चालढकल सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली असून त्यांनी जमा केलेली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. यावेळी कंपनीने जमा केलेली मूळ रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्याने बोईसर पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे अनेक गुंतवणूकदारांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत.