। पालघर । प्रतिनिधी ।
वसई-विरार शहरात नुकतीच पालिकेच्या वैद्यकीय विभागाने वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील बेकायदेशीरपणे दवाखाना चालविणार्या बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे. यावेळी डॉक्टर नसताना कर्मचार्याकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे उघड झाले आहे.
सातीवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय आरोग्य पथक तपासणीसाठी फिरत असताना भोयदापाडा राजावळी रस्त्यावर बालाजी क्लिनिक या नावाने कोणतीही परवानगी न घेता बोगस डॉक्टरद्वारे दवाखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी दुपारी डॉ. श्रीनिवासराव धुधमल आणि पथक यांनी पोलीसांना सोबत घेऊन याठीकाणी धाड टाकली. यावेळी डॉक्टर नसतानाही कामासाठी ठेवलेल्या कर्मचार्यांकडून रुग्णाला इंजेक्शन देऊन उपचार केले जात असल्याचे उघड झाले आहे. रामचंद्र रामदूर यादव असे या कर्मचार्याचे नाव असून कोणतीही वैद्यकीय डिग्री नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या दवाखान्याला डॉ. अरविंद कुमार यादव यांचा फलक लावून त्या ठिकाणी कर्मचारी रुग्णांना सेवा देत होता, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. तसेच, दवाखान्यात इन्जेक्शन्स, आय.व्हि.सेट व इतर अॅलोपॅथी औषधे आढळून आली असून याप्रकरणी रामचंद्र यादव याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.