। पालघर । प्रतिनिधी ।
काशिमीरा येथे गेल्या एका वर्षापासून एमएमआरडीएकडून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे वाहनांचे अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नीलकमल नाका येथे रविवारी (दि.8) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चारचाकी गाडी अर्धवट सिमेंट रस्त्यावरून खाली गटारात जाऊन अपघात झाला आहे. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे एमएमआरडीए अधिकारी आणि महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, नागरिकांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे. या ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.