। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील मध्य वैतरणा धरणातून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने बेसावधपणे पूल ओलांडून जात असलेले भास्कर नाथा पादीर (40) वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर, त्यांची मुलगी रुचिका (8) ही थोडक्यात बचावली आहे. ही दुर्घटना शनिवारी (दि.7)घडली आहे.
जिल्ह्यातील भास्कर पाधीर आणि त्यांची मुलगी रुचिका असे दोघे वैतरणा नदीवरील सावर्डे पुलावरून बेसावध जात असताना अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने भास्कर यांनी आपल्या मुलीला खांद्यावर उचलून घेतले. परंतु, पाण्याचा जोर जास्त असल्याने त्यांना स्वतःला सांभाळता आले नाही. यातच ते वाहून गेले. तसेच, अगदी शेवटच्या क्षणी काठावरील माणसांनी रुचिकाला हात देत सावरल्याने तीला सुखरूप बाहेर काढता आले आहे. मात्र, भास्कर यांचा शोध रात्री उशिरापर्यंत चालूच होता. परंतु, त्यांचा शोध लागला नाही.
अशा या घटणेंमुळे मध्य वैतरणा परिसर हा दुर्घटनांचे माहेरघर बनला आहे. परंतु, स्थानिक नेते मंडळी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन याबाबत उपाययोजना करत नसल्याने अशा दुर्घटना सातत्याने घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.6) रात्री उशिरापर्यंत मध्य वैतरणा धरणांतून विसर्ग करण्यात आला नव्हता. मात्र, शनिवारी (दि.7) संध्याकाळच्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता अचानक मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच, अजुनही काही लोक संध्याकाळी कामाहून शहापूर तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथे गावी परतत असतात. मात्र, येथील धोकादायक पुलाच्या दुतर्फा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली नाही. याबाबत येथील ग्रामस्थांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.