विवाहितेवर नातेवाईकांकडूनच अत्याचार
। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याण मधील एका तीस वर्षीय विवाहित महिलेवर घरात घुसून नातेवाईकांनीच सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच, वीट भट्टीवर काम करीत असलेल्या या विवाहित महिलेच्या तोंडाचा जबडा देखील मारहाणीत फाटला गेल्याचे बोलले जात आहे. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अत्याचाराबाबत अटक करण्यात आले आहे. पीडितेच्या लहान मुलांसमोरच आरोपींनी कृत्य केल्याने गाव पातळीवरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकंदरीत 67 गावांचा समावेश असून अत्यल्प पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागत आहे. यामुळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक ठिकाणी पोलिसांना घटनास्थळापर्यंत पोहोचायला नेहमीच उशीर होत असल्यामुळे या ठिकाणी गुन्ह्यांचा वाढता आलेख पहायला मिळत आहे. यातच तीस वर्षीय विवाहित महिला टिटवाळा नजीक पती आणि दोन मुलांसह वीट भट्टीवर काम करीत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. 6 सप्टेंबर रोजी पिडीतेचा पती बाहेर गेला असता रात्री दहापर्यंत तो आला नसल्याने याच संधीचा फायदा उठवत पीडितेचा सासरा, दीर आणि एका अल्पवयीन नातेवाईकाने झोपडीत घुसून विवाहितेवर सामुहीक अत्याचार केला आहे. पीडीताने अत्याचाराच्या घटनेबाबत पतीला सांगितले असता तिला याबाबत पतीनेच बेदम मारहाण करीत घडलेल्या घटनेबाबत कुठेही वाच्यता करू नकोस असा दमदेखील भरल्याचे सांगण्यात येत आहे. या पिडित महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारार्थ शुक्रवारी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना शुक्रवारी (दि.6) घडली असताना याबाबत कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये रविवारी (दि.8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असल्याची माहिती यावेळी कल्याण पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच, वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांनी तपासाला गती देत तीनही आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगितले आहे.
गतीमंद मुलीवर अत्याचार
देशात मुलींवर लैंगिक आत्याचार करण्याच्या घटना ताज्या असतानाच मुंब्र्यातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील कौसा भागातील देवरीपाडा परीसरात रहात असलेल्या एका 14 वर्षाच्या अल्पवयीन गतीमंद मुलीला खाऊचे अमिष दाखवून मुन्नवर खान (50) याने लैंगिक अत्याचार केले असून मोहम्मद अबिद याने छेडछाड केली आहे. ही बाब उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना मारहाण केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोलेकर यांनी दिली आहे.
बदलापुरात तरूणीवर अत्याचार
बदलापुरातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पिडीतेच्या मैत्रीणीच्या ओळखीच्या दोन तरुणांनी पिडीतेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील पिडीतेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. 3 सप्टेंबरच्या मध्यरात्री पिडीत तरुणी पनवेलमध्ये मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त पार्टीसाठी गेली असताना हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी तरुणी आणि इतर दोन जणांना बदलापूर पूर्व पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन मुलीची छेड
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका 23 वर्षीय युवकाने शनिवारी (दि.7) त्याच परिसरात एका घरा समोर खेळत असलेल्या सहा वर्षाच्या मुलीचा हात धरला. यावेळी त्या मुलीने घाबरून आरडाओरडा करताच स्थानिक नागरिकांनी त्या युवकाला पकडून चांगलाच चोप दिला आहे. तसेच, तिला खेचून दुसरीकडे नेण्याचा या युवकाचा प्रयत्न असल्याचा देखील आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.