अनेकांचे संसार उद्ध्वस्त; कारवाई करूनही माफियांकडून धंदे सुरु
। अलिबाग । कृषीवल टीम ।
रायगड जिल्ह्यात विविध भागांत मटका, जुगाराचे प्रमाण वाढले आहे. खेळविणारे मालामाल, तर खेळणारे कंगाल होत आहेत. ज्येष्ठांसह युवावर्ग मोठ्या प्रमाणात या मटक्याच्या विळख्यात बुडाला आहे. परिणामी, त्यांचे कुटुंब कर्जाच्या खाईत लोटले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर, अलिबाग तालुक्यातील ‘लक्ष्मी’ नावाच्या रिसॉर्टमध्ये बिनदिक्कतपणे जुगार सुरु असल्याचा पुरावा ‘कृषीवल’च्या हाती लागला आहे. त्यामुळे जुगाराचे अड्डे चालविणार्यांवर पोलिसांचा अंकुश नसल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
या धंद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. रायगड पोलिसांनी कारवाई करूनही माफियांकडून हे धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई केली आहे. कोणाच्या हद्दीत अवैध धंदा सुरु असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्याचा इशारा ते सातत्याने देत असतात. त्यामुळे संपूर्ण शहरात गावठी दारु, जुगार अड्ड्यांवर सातत्याने धाडी पडत असतात. तरीही जुगार अड्डे चालविणारे वेगवेगळ्या युक्त्या वापरुन आपले धंदे सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुरावे ‘कृषीवल’च्या हाती लागलेल्या पुराव्यावरुन समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध मटका जुगारासह चक्री ऑनलाईन जुगारातून गोरगरीबांची आर्थिक फसवणूक करणार्यांना रायगड पोलिसांनी दणका देण्याचे काम काही दिवसांपूर्वी केले. मटका जुगाराच्या आहारी जाऊन तरुण पिढी बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन रायगड पोलिसांनी कारवाईचे सत्र हाती घेतले.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये अधिकार्यांसह पोलीस कर्मचारी अशी एकूण 11 हून अधिक जणांची नेमणूक केली होती. या कारवाईतून मटकामाफियांना दणका मिळाला होता. अलिबागसह रोहा, मुरूड, खालापूर, कर्जत, पेण अशा अनेक तालुक्यांत ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात चक्री ऑनलाईन जुगार सुरु झाला आहे. हा धंदा राजरोसपणे तेजीत सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑनलाईन व्यवस्था
अनेक ठिकाणी हॉटेल, रिसॉर्टच्या नावाखाली हा धंदा चालविता जात आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नंबर लावून याठिकाणी चक्री जुगार खेळ खेळला जात आहे. पैसे संपल्यावर गुगल पेचीदेखील व्यवस्था या क्लबमध्ये आहे. चक्री जुगारामुळे दक्षिण रायगडमधील एका व्यक्तींवर मोठे आर्थिक संकट आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे हा धंदा बंद करण्यात यावा, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांकडून करण्यात आली आहे.
तरुण देशोधडीला
काहींना जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार राजरोसपणे सुरू आहे. दिवसागणिक या अवैध व्यवसायांची उलाढाल वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता रस्त्या-रस्त्यांवर आडोसा पाहून चालविला जात आहे. सकाळपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मटका बुकी चालतात. ओपन, क्लोज अशा दोन्ही वेळेला या भागात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळते.
तरुण खिशात पैसा नसेल, तर उधार मटका खेळू लागले आहेत. मटक्यातून झालेली लाखो रुपयांची उधारी फेडण्यासाठी खासगी सावकारांकडून दहा ते वीस टक्के व्याजाने पैसे घेतले जात असल्याची चर्चाही ऐकण्यास मिळाली. यामुळे संपूर्ण कुटुंब सावकारीच्या विळख्यात अडकत आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी मटक्याचे पेव वाढत आहे.
बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड