। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात पोलिओचा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, जिल्ह्यात पोलिओने शिरकाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. अलिबाग तालुक्यातल एका साडेचार वर्षांची मुलगी पोलिओ संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुलीची तपासणी करून स्थूल सँपल प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकार्यांनी दिली.
पोलिओमुळे कायमचे अपंगत्व येण्याचा धोका कायम असतो. पोलिओ होऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पोलिओ दिन साजरा केला जातो. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत मुलांना पोलिओचा डोस दिला जातो. एका दिवसापुरता हा उपक्रम न राबविता त्यानंतर पाच दिवस हा उपक्रम ठेवला जातो. एसटी स्थानकापासून रेल्वे स्थानक तसेच घरोघरी जाऊन परिचारिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर लहान मुलांना पोलिओचा डोस देतात. त्यामुळे जिल्ह्यात पोलिओला कधीच थारा मिळाला नाही. इतक्या उपाययोजना करूनही तसेच उपक्रम राबवूनही रायगड जिल्ह्यात पोलिओने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. अलिबाग तालुक्याती ग्रामीण भागात एक साडेचार वर्षांची मुलगी पोलिओ संशयित असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, त्यांनी त्या मुलीच्या घरी जाऊन चौकशी करून तिची तपासणी केली. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. स्थूल सँपल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यावर पोलिओ आहे की नाही, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून माहिती मिळाली आहे.
पोलिओची कारणे
संसर्ग सामान्यतः संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या (विष्ठे) संपर्कातून किंवा खोकल्यामुळे किंवा शिंकताना येणार्या थेंबांद्वारे एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरतो. जर विषाणूचा थोडासा भागही दुसर्या व्यक्तीच्या हातावर, अन्नावर किंवा पिण्याच्या पाण्यात आणि लसीकरण न झालेल्या व्यक्तीच्या तोंडात गेला तर त्यांनाही संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर विषाणू आतड्यात जाऊन संसर्ग होऊ शकतो. तिथून तो गुणाकार होऊ शकतो आणि रक्तप्रवाहात किंवा मज्जासंस्थेत जाऊ शकतो. ज्यामुळे गंभीर लक्षणे उद्भवू शकतात. संसर्ग झाल्यापासून लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी (उष्मायन कालावधी) 3 ते 21 दिवसांचा असतो. हा विषाणू शरीरात काही काळ राहू शकतो आणि तो सहा आठवड्यांपर्यंत विष्ठेत आणि लाळेत दोन आठवड्यांपर्यंत राहू शकतो.