रायगड प्राधिकरणकडून होणार्या कामांवर नाराजी
| महाड | प्रतिनिधी |
ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने स्थानिक नागरिकांमधून रायगड प्राधिकरणाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शौचालयांनादेखील पाणी नसल्याने शिवप्रेमींची गैरसोय होताना दिसत आहे.
पाचाड गावामध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा आणि समाधी स्थळ असल्याने या गावालादेखील ऐतिहासिक महत्त्व आहे. रायगडावर येणारा पर्यटक शिवप्रेमी या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात. मात्र, कित्येक वर्षे राजवाडा परिसर आणि समाधी स्थळ सौंदर्य करण्यापासून दुर्लक्षित राहिले आहे. सध्या शासनाकडून या ठिकाणी अनेक कामे सुरू आहेत. राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या समाधी स्थळाजवळ सुशोभिकरणाचे काम रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने अनेक कामे निकृष्ट दर्जाची, तर अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. हीच स्थिती पाचाडमध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून झालेल्या अनेक कामांची आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राजमाता जिजाऊ मातेच्या समाधी स्थळाजवळ दगडी काम तसेच शेजारी असलेल्या बगीचाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. मात्र, गेली दोन वर्षे होऊन अधिक काळ या ठिकाणी आणण्यात आलेले दगड तसेच पडून आहेत. परिसरामध्ये उगवलेल्या गवताला वणव्याने घेरल्यामुळे अनेक झाडांचे तसेच पाईप जळून खाक झाले आहेत. समाधीस्थळाजवळ स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, या स्वच्छतागृहाला पाणीच नसल्याने वर्षभरापासून हे स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे. पाणी नसल्याने प्राधिकरण व्यवस्थापनाने स्वच्छतागृहांना टाळे लावले आहे. यामुळे येणार्या पर्यटकांचे हाल होत आहेत. पाचाड येथील राजवाडा परिसरातदेखील रायगड प्राधिकरणाकडून केवळ मुख्य रस्ता ते राजवाडा या पथमार्गाचे काम झाले आहे. राजवाड्याची मात्र अत्यंत दुरवस्था आहे. रायगड प्राधिकरण या ठिकाणी काम करत असले तरी भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे ऐतिहासिक वास्तू येत असल्याने पुरातत्व विभागाचे या सर्व कामकाजाकडे दुर्लक्ष आहे. महिनाभरापूर्वी या परिसरात लागलेल्या वणव्याने राजवाड्याचेदेखील नुकसान झाले होते. राजवाड्याच्या भिंतीवर आणि आतील परिसरात उगवलेले गवत आजही जैसे थे आहे.
पाचाड गावामध्ये असलेल्या धर्मशाळेचीदेखील काम पूर्ण झाले असले तरी हे काम आणि निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अद्याप या ठिकाणी अनेक कामे बाकी असल्याने धर्मशाळादेखील टाळे बंद करून ठेवलेली आहे. धर्मशाळेच्या एकूण दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र, हे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा स्थानिकांमधून उमटत आहे. धर्मशाळेच्या परिसरात बांधण्यात येणार्या खोल्यांची कामेदेखील अपूर्ण अवस्थेत आहेत. शिवाय, या ठिकाणीदेखील बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाला पाणी नसल्याने हे स्वच्छतागृहदेखील टाळे लावून बंद ठेवल्याने पर्यटकांना खासगी हॉटेलमधून पैसे मोजून स्वच्छतागृहासाठी जावे लागत आहे. धर्मशाळेच्या मागील बाजूस बांधण्यात आलेल्या शेडच्या जोत्याचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सिमेंटचा कोणताच कण या ठिकाणी दिसत नसून, बांधकाम सुरू असताना पाणी कमी वापर झाल्याने बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
धर्मशाळेवर लाखो रुपये खर्च झाले, पण आतापर्यंत एक पर्यटकदेखील यात राहिलेला नाही. शेजारी बांधलेलं बांधकामदेखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. गावात पाणी नसल्याने बांधण्यात आलेले स्वच्छतागृहदेखील बंद आहेत.
जयेश लामजे,
माजी सरपंच, पुणाडेवाडी
गावात गेली अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आजदेखील तीच अवस्था आहे. शासनाने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून इतर विकासात्मक कामांवर भर दिला. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
देवदास गायकवाड,
माजी सरपंच