20 जणांवर गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील कर्जत शिंगढोल येथे बेकायदेशीर जमीन हस्तांतरण आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क मिळवण्याचा प्रयत्न होता. हा गुन्हा उघडकीस आला असून, विविध 20 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. तब्बल 22.62 एकर जमीन बोगस कागदपत्रांद्वारे हडपण्यात आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात 20 आरोपींवर गुन्हा दाखल असून, एकही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला नसल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई येथील अॅड. सुशांत अरोरा यांनी आशिलाच्यावतीने कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार टिना बलसारा यांच्या मालकीची जमीन शिंगढोल येथे असून, या जमिनीची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आली आहे. जमिनीचे आधी हस्तांतरण करून नंतर त्या जमिनिची विक्री वेगवेगळ्या व्यक्तींना करण्यात आली आहे. 22 एकर जमिनीचा सरकारी भाव काही कोटींच्या आसपास असून, बाजारभावात ही जमिनी सरकारी मूल्यांकनापेक्षा दुप्पट भावाने विकली गेल्याचा संशय आहे. अॅड. अरोरा यांच्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यातील 20 पैकी एकाही आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. या गुन्ह्यातील आरोपींमध्ये लालचंद घरत (शिंगढोल), चंद्रकांत पाटील (भिवंडी), रवींद्र देशपांडे (अंबरनाथ), अनंत कार्ले (मोहपाडा), कैलास पाटील (तळोजा), कृष्णा पाटील (दहिसर), रवींद्र कोंडिलकर (चौक) आणि इतर यांचा समावेश आहे. या गैरव्यवहारात बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, खोट्या साक्षीदारांचा वापर करून सरकारी नोंदींमध्ये फेरफार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या जमिनीची विक्री गुन्ह्यातील मुख्य आरोपींनी नऊ ऑक्टोबर 2017 रोजी बनावट खरेदीखत तयार करून ही जमीन स्वतःच्या नावावर केली आणि 2024 पर्यंत सदर जमीन विकण्यात आली आहे. 8 मार्च 2025 रोजी कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून, रजिस्टर क्रमांक 62/2025 असा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पंधरा दिवस उलटले तरी एकाही आरोपीला अटक नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची जोरदार चर्चा. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेले करत आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार आणि स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.