। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 376 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त झाल्याचा दावा जिल्हा क्षयरोग विभागाने केला आहे. या ग्रामपंचायतींना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सोमवारी गौरविण्यात आले. या आकडेवारीनुसार, जिल्हा ठरल्याचे समोर येत आहे.
जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी आश्वासक पावले उचलण्यात येत आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मागील काही दिवसात पाच लाख 17 हजार 814 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अतिजोखीमग्रस्त भाग, वयोवृद्ध, धूम्रपान-मद्यप्राशन करणार्या व्यक्ती, कुपोषित व्यक्ती व मागील पाच वर्षांतील क्षयरोगबाधित रुग्ण, टीबी रुग्णाशी संपर्कातील व्यक्ती, मधुमेहबाधित, एचआयव्हीबाधित व इतर जोखीमग्रस्त व्यक्तींचा समावेश होता. 2024 या वर्षात 4 हजार 218 नवीन क्षयरुग्ण आरोग्य विभागाने शोधून काढले आहेत. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींपैकी 376 ग्रामपंचायतींमध्ये एकही क्षयरुग्ण नसल्याने या ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.
जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने सोमवारी क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा क्षयरोग विभाग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील आशा सेविका व अंगणवाडी सेविका क्षयरोग रुग्ण तपासण्याचे काम करतात. क्षयरोग होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाते. दरवर्षी 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिनही साजरा केला जातो. आठ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. या विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद असला, तरीदेखील उर्वरित 434 ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचण्यास ही यंत्रणा उदासीन ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे या विभागाच्या कामाबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरीयम ट्यूबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होतो. रायगड जिल्ह्यातील लोकसंख्या ही स्थलांतरित असून, येथे आदिवासी भाग सर्वात जास्त आहे. तरीही आपल्या जिल्ह्याचे काम खूप चांगले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांनी प्रयत्न केल्याने 376 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेस फंडातून क्षयरुग्णांना तीन महिन्यांचे औषधाचे किट देण्यात येत आहेत.
डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
रायगड जिल्हा टीबीमुक्त करायचा असेल तर वैयक्तिक स्वच्छतेलाही महत्त्व दिले पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता राहिली तर कुटुंब स्वच्छ राहील आणि कुटुंब चांगले राहिले तर गाव चांगले राहील. गाव चांगले राहील तरच आपला जिल्हा चांगला राहील. स्वच्छतेमुळे क्षयरोगच नाही, तर इतर आजारांनाही आळा घालू शकतो. एखादी योजना यशस्वी करायची असेल तर त्या कामांमध्ये सातत्य असले पाहिजे. त्या योजनेची आपल्याला उद्दिष्ट माहीत असणे आवश्यक आहे आणि उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपण मेहनत घेतली पाहिजे, तरच यश मिळेल. क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींनी हे सातत्य राखावे.
किशन जावळे,
जिल्हाधिकारी, रायगड