पीओपीच्या मूर्ती बनवताना पेंढ्याचा वापर
। उरण । वार्ताहर ।
तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे उत्पादन घेतले जाते. मळणीनंतर उरलेल्या पेंढ्याला वैरण म्हणून मोठी मागणी आहे. या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या वैरणीसह सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे या पेंढ्याच्या विक्रीतून शेतकर्यांना आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेती मागे पडली आहे तसेच तालुक्यातील पशुधन कमी झाल्याने हा पेंढा शेतकरी घरात न वापरता विकत आहेत. भाताची मळणी झाली की शेतात पेंढा व्यवस्थित रचून साठवून ठेवला जात आहे. उरण तालुक्यात आणि घरात गाई, म्हशी, रेडे, बैल, बकर्या असे पशुधन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे हा पेंढा नागरिक विक्री न करता आपल्याच गाई, म्हशी, बैलांना खाण्यासाठी राखून ठेवत असत. आता पशुधन कमी होत आहे. त्यामुळे गाई, म्हशींचे गोठेदेखील लुप्त होत चालले आहेत. त्यामुळे हा पेंढा उरण तालुक्यातील नागरिक विकत आहेत. त्यातून नागरिकांना चांगली आर्थिक प्राप्ती होत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे हा पेढा जनावरांचे खाद्य म्हणून वापरला जात आहे. त्याचप्रमाणे पेंढ्यापासून अनेक सजावटीच्या वस्तू बनवल्या जात असल्याने या पेंढ्याला मोठी मागणी आहे. पीओपीच्या मूर्ती बनवताना पेंढ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे व्यापारी उरण तालुक्यातील गावोगावी जाऊन हा पेंढा गोळा करीत आहेत.