अलिबागमधील व्यावसायिक महिलेची आर्थिक लूट

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809

दुप्पट पैसे करण्याच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

दुप्पट पैसे करण्याचे आमिष दाखवून पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली. चहाची टपरी चालविणाऱ्या व्यावसायिक महिलेची आर्थिक लूट करण्यात आली असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागमधील चेंढरे येथील रहिवासी असणाऱ्या महिलेचा चहाच्या टपरीचा व्यवसाय आहे. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सॲप कॉल आला. त्यांनी कॉल रिसिव्ह केला. त्यानंतर अज्ञाताने त्यांच्याशी कॉलद्वारे ओळख करून घेतली. त्यांचा विश्वास संपादन केला. अखेर महिला जाळ्यात अडकत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने बाहेर देशातून भारतात येण्यासाठी भारतीय चलनाची मागणी केली. ते पैसे दुप्पट करून दिले जातील असे खोटे आश्वासन दिले. त्या अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून व्यावसायिक महिलेने त्यांच्या खात्यातील पाच लाख, तीन हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन व बँकेतून टप्प्या टप्प्याने पाठविली. मात्र, त्यानंतर अज्ञात आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न महिलेने केला. परंतु, संपर्क झाला नाही. अखेर फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक किशोर साळे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version