लेक लाडकी योजनेला मोठा प्रतिसाद; जिल्ह्यातील 6,280 मुलींना लाभ
| रायगड | प्रतिनिधी |
मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेचा रायगड जिल्ह्यात चांगला परिणाम दिसून येत असून, जानेवारी 2024 ते मार्च 2026 या कालावधीत हजारो कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून रायगड जिल्ह्यात जानेवारी 2024 ते मार्च 2026 दरम्यान एकूण 6 हजार 280 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी या योजनेमुळे मोठा आधार मिळत आहे.
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, शिक्षणाचा स्तर उंचावणे, बालमृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि कुपोषणावर नियंत्रण आणणे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्याचाही या योजनेचा हेतू आहे. योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये दिले जातात. पुढे इयत्ता पहिली, सहावी आणि अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यावर अनुक्रमे 6 हजार, 7 हजार आणि 8 हजार रुपये दिले जातात. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75 हजार रुपये दिले जात असून, एकूण लाभ 1 लाख 1 हजार रुपयांपर्यंत पोहोचतो. ही रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने दिली जाते.
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. तसेच एका मुलगा व एका मुलगी असलेल्या कुटुंबातील मुलीलाही पात्रता आहे. दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास त्या मुलींनाही लाभ दिला जातो. रायगडमध्ये या कालावधीत एकूण 7 हजार 198 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 6 हजार 280 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला असून, एकूण 3 कोटी 14 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित 918 लाभार्थ्यांना निधी उपलब्ध होताच लाभ देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांनी अधिकाधिक पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
योजनेसाठी अटी
आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. 2. 1 एप्रिल 2023पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. 3. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. 4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी जन्माचा दाखला, 2. कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला याबाबात तहसिलदार किंवा सक्षम अधिका-यांचा दाखला आवश्यक, 3. लाभार्थीचे आधारकार्ड, 4. पालकांचे आधारकार्ड, 5. लाभार्थी व माता यांच्या संयुक्त बॅक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, 6. रेशनकार्ड पिवळे अथवा केशरी छायांकित प्रत, 7. अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक.
