पावरलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रतीक्षा गायकवाडला अर्थसहाय्य

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा बबन गायकवाड मु.आसनपोई या आंतरराष्ट्रीय खेळाडूला कॉमनवेल्थ पावरलिफ्टिंग क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान होणार्‍या या स्पर्धेसाठी 84 किलो वजनी गटात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी येणारा खर्च अधिक असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी व सामाजिक सेवाभावी संस्था, एनजीओ आदींनी अर्थसहाय्य करण्याचे आवाहन प्रतिक्षाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय सोनावणे यांच्याकडून अर्थसहाय्य करण्यात आले आहे. डॉ. सोनावणे हे नेहमीच देशाप्रती अभिमान बाळगत होतकरू व जिगरबाज खेळाडूंना स्वयंस्फूर्तीने सहकार्य व मदत करीत असतात. त्यांच्या या सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम व सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतीक्षा आता पावरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने रायगडवासीयांसाठी व समस्त भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे.

प्रतीक्षाने भारत देशाचे प्रतिनिधीत्व करताना आजवर महाविद्यालयीन, रेल्वे, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण, कांस्य, रौप्य अशी 32 पदके मिळवले आहेत. न्यूझीलंड येथे होणार्‍या कॉमन वेल्थ पावरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे, स्वराज सोनावणे, अनिल भातनकर, वैशाली शिर्के आदी उपस्थित होते.

स्पर्धेसाठी येणारा खर्च अडीच लाख व इतर खर्च एक लाख असा एकूण साडे तीन लाख इतका खर्च येणार असून प्रतीक्षाची घरची परिस्थिती पाहता हा खर्च उचलणे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर देशाचे प्रतिनिधित्व करीत असताना या कामी सर्वांनी अर्थसहाय्य करून हातभार लावावा.

प्रतीक्षा गायकवाड
आंतरराष्ट्रीय खेळाडू
Exit mobile version