सहकार आयुक्तांचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कर्जवसुली करताना कलम 101 किंवा जप्ती वगैरे मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा कर्जदारांना त्यांच्या अडचणींना समजून घेऊन मार्ग काढावा, असे मार्गदर्शन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
अनिल कवडे यांनी अलिबाग दौर्यात कमळ नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली. त्यावेळी कमळचे पदाधिकारी, सर्व संचालक व कर्मचार्यांना संबोधन करताना कवडे यांनी कमळकडून अंगिकारलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे कौतुक केले. कमळच्या कोअर बँकींग प्रणालीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. प्रास्तविकामधून कमळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी कमळच्या वेगवान प्रगतीचा धावता आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कमळचे अनोखे उपक्रम विशद केले. त्यामध्ये सहकार दर्शन हे पाक्षिक, विविध शाखांमधून सेवा देत असलेली वाचनालये, महिला बचत गटांना वितरीत केलेले भरीव अर्थसहाय्य व देशी गाईंच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सहयोग गोशाळेला दिलेले अर्थसहाय्य यांना त्रोटक परिचय करून दिला. त्याचबरोबर ठराविक कालावधीनंतर बदलते पदाधिकारी ही कमळची खासियत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शैलेश कोतमिरे, आप्पाराव धोलकर, राम शिर्के डॉ.सोपानराव शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी सहकार वृद्धिंगत करण्यासाठी शासनाच्या ज्या योजना असतील त्यासाठी पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले. पीएनपी नाट्यगृहात योजिलेल्या या कार्यशाळेचा कामकाजात स्लाईड शो, व्हिडीओ या सर्वांचे यशोचित संचालन केल्याबद्दल मान्यवरांनी कमळचे कर्मचारी मंगेश राऊळ व मंदार गुरव यांचे विशेष कौतुक केले.
कर्जदारांच्या अडचणी समजून मार्ग काढा
