| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. संस्थेने केलेली प्रगती प्रेरणादायी आहे, अशी प्रशंसा राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी केली. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे शुक्रवारी (दि. 18) अलिबागला आले होते. त्यावेळी त्यांनी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत सहकारी संस्था अप्पर निबंधक शैलेश कोतमीरे, कोकण विभाग सहनिबंधक आप्पाराव घोळकर, मुंबई विभाग लेखापरीक्षण सहनिबंधक राम शिर्के, रायगड जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे उपस्थित होते.
चुकीचे काम केल्यामुळे पतसंस्था अडचणीत येतात. त्यामुळे संचालक मंडळ व प्रशासनाने सजग राहून सदसदविवेक बुध्दीने काम केले पाहिजे. चांगले मापदंड निर्माण करून प्रेरणादायी काम केले पाहिजे. ग्राहकांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण केली पाहिजे, असे अनिल कवडे म्हणाले. आदर्श पतसंस्थेने आता आपले काम अधिकाधिक डिजिटालायझेशन करण्यावर भर द्यावा. बँकींग संबंधित इतर व्यवसायातून नफा मिळविण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला सहकारी संस्था अप्पर निबंधक शैलेश कोतमीरे यांनी यावेळी दिला.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. आदर्शचे उपाध्यक्ष सतीश प्रधान, सेक्रेटरी कैलास जगे, संचालक सुरेश गावंड यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. आदर्शचे संचालक अभिजीत पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील व मुख्याधिकारी उमेश पाटील यांनी पाहुण्यांना आदर्श पतसंस्थेची माहिती दिली.