तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या घोषणांनी शहर निनादले
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
हातात तिरंगा… दुचाकींवर डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज… ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी अलिबागचे रस्ते दुमदुमलेले.. निमित्त होते शुक्रवारी (दि.14) स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीचे. संपूर्ण शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमुळे अलिबाग तिरंगामय झाल्याचे दिसून आले. घराघरात देशभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच स्वातंत्र्य दिनाचे महत्त्वदेखील या तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या रॅलीत अलिबागकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रप्रेमाचा जल्लोष केला.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, अभिमान आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी किशन जावळे, नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी-कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. दुचाकींवर तिरंगा फडकवत आणि देशभक्तीच्या घोषणा देत नागरिकांनी शहरातून मार्गक्रमण केले. त्यामुळे अलिबागच्या रस्त्यांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नगरपरिषद कार्यालयाच्या आवारातून सुरू झालेली रॅली एसटी स्थानक, महावीर चौक, ब्राह्मण आळीतील श्रीराम मंदिर, नेने यांचे घर, जुने नगरपरिषद कार्यालय, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी बाजारपेठ, जामा मशिद, मारुती नाका मार्गे अलिबाग समुद्रकिनारी पोहोचली. समुद्रकिनारी देशभक्तीच्या जल्लोषात रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान नागरिकांना प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. अलिबागकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
तिरंग्याखाली एकवटले अलिबाग!
धर्म, इतिहास, व्यापार आणि समुद्रकिनाऱ्याची ओळख असलेल्या अलिबागला तिरंगा बाईक रॅलीने एका राष्ट्रध्वजाखाली एकत्र आणले. युवक, महिला आणि विविध समाजघटकांचा सहभाग हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले. देशभक्ती केवळ स्वातंत्र्यदिनापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या आचरणातही दिसावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अलिबागकरांच्या मनात देशभक्तीची ज्योत कायम प्रज्वलित आहे. ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून या भावनेला व्यापक लोकसहभाग मिळावा, हा आमचा उद्देश होता. तिरंगा बाईक रॅलीने अलिबागला एका राष्ट्रध्वजाखाली एकत्र आणत राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
अक्षया प्रशांत नाईक,
नगराध्यक्षा
तिरंगा बाईक रॅली ही केवळ स्वातंत्र्यदिनाची मिरवणूक नव्हती, तर अलिबागच्या सामाजिक ऐक्याची आणि नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाची अभिव्यक्ती होती. युवक, महिला आणि प्रत्येक समाजघटकाने उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने ‘हर घर तिरंगा’चा संदेश खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला.
ॲड. मानसी म्हात्रे,
उपनगराध्यक्षा











