पवन म्हात्रे, जयश्री म्हात्रे यांच्या पदोन्नतीने कोप्रोली व कुसुमळे गावचा गौरव
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील कोप्रोली गावचे सुपुत्र पवन प्रकाश म्हात्रे आणि अलिबाग तालुक्यातील कुसुमळे गावच्या कन्या जयश्री पवन म्हात्रे (ठाकूर) या पती-पत्नींची महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव (गट-अ) पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. एकाच वेळी पती-पत्नीने महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय पदावर मजल मारल्याने रायगड जिल्ह्यातील उरण आणि अलिबाग तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पवन प्रकाश म्हात्रे हे कै. प्रकाश गजानन म्हात्रे यांचे सुपुत्र असून, त्यांनी बी.कॉम., एलएल.बी., एलएल.एम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात गेल्या सुमारे 25 वर्षांपासून विविध पदांवर काम करताना त्यांनी प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव मिळवला आहे. त्यांच्या या दीर्घ सेवाकाळानंतर त्यांची अवर सचिवपदी पदोन्नती झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी जयश्री पवन म्हात्रे (ठाकूर) यांनी बी.ए., एलएल.बी.पर्यंत शिक्षण घेतले असून, त्या देखील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचीही पदोन्नतीने अवर सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
अवर सचिव हे महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील महत्त्वाचे राजपत्रित अधिकारी पद असून, या स्तरावरील अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय कामकाज, प्रस्ताव व कागदपत्रांची छाननी, धोरणात्मक बाबींचा पाठपुरावा तसेच वरिष्ठ स्तरावरील निर्णय प्रक्रियेसाठी आवश्यक कामकाजाची जबाबदारी असते. पती-पत्नी दोघांनीही विधानमंडळ सचिवालयातील विविध पदांवर प्रदीर्घकाळ सेवा बजावत पदोन्नती मिळवत हे महत्त्वाचे पद गाठले आहे. त्यांच्या या यशामुळे कोप्रोली (चिरनेर) आणि कुसुमळे या दोन्ही गावांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पवन म्हात्रे व जयश्री म्हात्रे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उरण, कोप्रोली तसेच कुसुमळे परिसरातील मित्रमंडळी, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.







