जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्‍वर म्हात्रेंचे तोंडावर बोट

| पेण | प्रतिनिधी |

कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांचा पेण येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शिक्षक सेवकांना वाढलेले दहा हजारांचे मानधन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये झालेली वाढ, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मुलांना दिलेले गणवेश, अंगणवाडी सेविकांना वाढवून दिलेले मानधन, तासिका शिक्षकांना वाढून दिलेले मानधन, लेक लाडकी योजना या सर्व बाबी आपल्या प्रयत्नांमुळेच झाल्यात, असे वक्तव्य त्यांनी पेण येथे केले. मात्र, जुन्या पेन्शन योजनेबाबत ब्र शब्ददेखील काढला नाही.

ते पुढे म्हणाले की, मला फक्त कोकणातीलच लोक फोन करत नाहीत, तर राज्यातून सर्वजण फोन करतात. फोन घेण्यासाठी मी तीन-तीन पीए ठेवले आहेत. अंगणवाडी सेविकांना जे मानधन वाढले आहे, ते फक्त आणि फक्त मी केलेल्या संघर्षार्मुळेच. त्यासाठी आझाद मैदानावर, रायगडावर संघर्ष केला, असे असताना आ. ज्ञानेश्‍वर म्हात्रे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत असतील, तर याला फेकाफेकीच म्हणावी लागेल. विधान परिषदेत सभागृहात फक्त एकच मी सिनियर आहे. सभापती हेडमास्टर आहेत, तर बाकी सर्व आमदार हे खोडकर विद्यार्थी आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. खरे तर, विधान परिषद हे ज्येष्ठांचेच सभागृह मानले जाते. शिवाय, इथं तीन ते चार वेळा आमदार असणारे ज्येष्ठ सदस्य सर्व पक्षांमध्ये आहेत. असे असूनही म्हात्रे यांनी असे वक्तव्य केल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. ज्ञानेश्‍वर म्हात्रे ज्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आक्रमक होते, त्याबाबत एक ब्र शब्दही त्यांनी आपल्या भाषणात काढला नाही.

पेण एज्युकेशन सोसायटीतर्फे ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांचा बाप्पाची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले, तर सुधीर जोशी व अ‍ॅड. मंगेश नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version