शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर बोट

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी उपाध्यक्ष व गटनेते रणजित देसाई यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सकारात्मक चर्चा होत सातत्याने विलंबाने होणारे वेतन वेळेत करण्याचे मुख्य लेखाधिकार्‍यांनी आश्‍वासन दिले.
या चर्चेत गेले अनेक दिवस शिक्षकांचे पगार सातत्याने विलंबाने होत आहेत. ही बाब संघटनेच्यावतीने अध्यक्ष सौ. सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच कार्यपद्धतीबद्दल संघटनेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर अध्यक्ष सौ. सावंत यांनी शिक्षकांचे पगार शासनाकडून अनुदान प्राप्त होताच पाच ते सहा दिवसात करण्याचे निर्देश वित्त व लेखा अधिकारी वल्लरी गावडे यांना दिले. त्यावेळी वित्त व लेखा अधिकारी यांनी यापुढे शिक्षकांचे पगार अनुदान प्राप्त होताच पाच ते सहा दिवसात करण्याचे मान्य केले.
तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव गेले दहा महिने प्रशासनाकडून अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाहीत ही बाब अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावेळी शिक्षणाधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावातील त्रुटी दूर करुन 31 डिसेंबर 2021 पर्यंत सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले व यापुढे तालुका कार्यालयांकडून कोणत्याही प्रकारच्या त्रुटी न राहता परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात येतील, असेही आश्‍वासन दिले. दरम्यान, आंतर जिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करणे व आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक पाच मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करणेबाबत डिसेंबर मध्ये संघटने सोबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्‍वासन अध्यक्ष सौ सावंत यांनी दिले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पराडकर, वित्त व लेखाधिकारी वल्लरी गावडे, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख उपस्थित होते. संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, राज्य संघटक किसन दुखंडे, सरचिटणीस अरुण पवार, मुख्य सल्लागार महेश नाईक, उपाध्यक्ष जनार्दन पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र देसाई, कार्यालयीन सचिव दिनकर शिरवलकर, आंतरजिल्हा बदली प्रतिनिधी सचिन डोळस उपस्थित होते.

Exit mobile version