10 ते 12 दुकाने जळून खाक
| भिवंडी | प्रतिनिधी |
भिवंडी मार्गावरील कशेळी परिसर गुरुवारी (दि.19) दुपारी भीषण आगीच्या घटनेने हादरून गेला. येथील प्रसिद्ध चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्निचर मार्केटला अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे फर्निचरची सुमारे 10 ते 12 मोठी दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, शेजारील भंगार गोदामालाही या आगीने आपल्या कचाट्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास चामुंडा कॉम्प्लेक्समधील एका दुकानातून धुराचे लोट येऊ लागले. फर्निचर आणि लाकडी साहित्य असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी शेजारच्या 10-12 दुकानांना वेढले. हवेचा वेग आणि ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरत गेली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिन्ही शहरांच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब ठरली.नुकसान मोठे, आगीचे कारण गुलदस्त्यातया आगीत व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे फर्निचर आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे. फर्निचर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात महागड्या सोफा सेट, बेड आणि कपाटांचे साठे होते, जे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असून पोलीस आणि अग्निशमन दल आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.
