। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूरच्या इतवारी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका अत्तराच्या दुकानाला भीषण आग लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. इतवारी परिसरातील आठवड्याभरातील आगीची ही दुसरी घटना आहे.
ही घटना बुधवारी (दि.07) पहाटेच साडेचारच्या सुमारास घडली. नागपूरच्या इतवारी परिसरातील खापरीपुरा येथील तीन मजली असलेल्या एका इमारतीच्या खालच्या माळावरील अत्तरचे गोदाम असलेला दुकानाला आग लागली. मात्र, याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या बाकडे कुटुंबियांना याची कल्पना नव्हती. खालून लोकांनी त्यांना आवाज दिले मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर गेले. त्यांनी प्रवीण बाकडे आणि त्याची पत्नी प्रीती बाकडे यांना बाहेर काढले. त्यांचा मुलगा टेरेसवर गेला आणि मुलगी अनुष्का बाथरूममध्ये गेली. तिने दार बंद करून घेतल्याने ती बेशुध्द झाली होती. मुलगी आत असल्याचे कळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. तर, जखमींना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.