शेतकर्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प उभारा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
धेरंड-शहापूर येथील सीनारमास कंपनीपर्यंत जाण्यासाठी पोहोच रस्त्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु झाल्या आहेत. विश्वासात न घेता सक्तीचे संपादन प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. याविरोधात शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत धेरंड-शहापूर परिसरात आलेल्या एमआयडीच्या अधिकार्यांना मंगळवारी (दि.6) धारेवर धरले. त्यावेळी अधिकार्यांची तारांबळ उडाली. अखेर त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
शहापूर, धेरंड येथील जमिनी टाटा प्रकल्पासाठी संपादित केल्या होत्या. त्या प्रकल्पाला शेतकर्यांनी विरोध केल्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला. या संपादित केलेल्या जागेवर सीनारमास प्रकल्प येत आहे. सुमारे 387 हेक्टर जागेमध्ये हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी सुमारे तीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र धेरंड, शहापूर येथील शेतकर्यांना विश्वासात न घेता ही जमीन संपादित केली जात असल्याने शेतकर्यांनी याबाबत तीव्र विरोध दर्शविला आहे. दोन ते तीन बैठका याबाबत झाल्या; परंतु सरकारकडून शेतकर्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच शेतकर्यांना डावलून जमीन संपादित करण्याचा प्रकार सरकारने सुरु केल्याने धेरंड-शहापूर येथील शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा प्रशासनाविरोेधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे व सहाय्यक अभियंता औदुंबर आलट यांनी मंगळवारी त्या जागेची पाहणी करण्यासाठी दौरा केला. शेतकर्यांनी त्यावेळी त्यांना जाब विचारला. कोणत्या कायद्यानुसार जमीन संपादित केल्या जात आहेत. शेतकर्यांना योग्य मोबदला देण्याबाबत शेतकर्यांची बैठक घेतली का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत शेतकर्यांनी त्यांना धारेवर धरले. त्यामुळे ननवरे शेतकर्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास असमर्थ ठरले. प्रधान सचिव, उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकर्यांची संयुक्त बैठक घेऊनच निर्णय घेण्यात यावा. शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रकल्पाला तीव्र विरोध राहणार आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केली. शेतकर्यांची आक्रमक भूमिका पाहता, अखेर अधिकार्यांनी तेथून काढता पाय घेतला.
शेतकर्यांकडे जिल्हाधिकार्यांची पाठ
इंडिनेशियातील सीनारमास हा प्रकल्प या धेरंड-शहापूर परिसरात येत आहे. या प्रकल्पापर्यंत पोहोच रस्ता उभारणीसाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शेतकर्यांना योग्य मोबदला आणि इतर सुविधांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात, अशी शेतकर्यांची मागणी आहे. शेतकर्यांसमवेत या प्रश्नाबाबत बैठक घेण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकार्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकार्यांना त्यासाठी वेळच मिळत नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकर्यांकडे जिल्हाधिकार्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.