। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 च्या धावपट्टी परिसरात गुरुवारी (दि. 9) संध्याकाळी आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन यंत्रणा आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत कोणत्याही जीवितहानी झाली नसली तरी विमानतळावरील प्रवेश द्वार (गेट) बंद करण्यात आल्याने काही वेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळावरून दिवसाला सुमारे एक हजार विमानाची ये -जा होते. टर्मिनल 1 वरून विशेषकरून देशातर्गत विमान सेवा होते. गुरुवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास टर्मिनल 1च्या धावपट्टी जवळ आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. खबरदारी म्हणून तात्काळ विमान वाहतूक थांबविण्यात आली होती.
मुंबई विमानतळावर आग
