भयानक! जलपाडा येथील फटाका फॅक्टरीला आग

आग विझविण्याचा प्रयत्न सुरु
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील तळवडे जलपाडा येथील फटाक्यांच्या गोडावूनला आकस्मित आग लागून सदर गोदाम भस्मसात झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या गोदामात पोयनाड पोलिसांनी दिवाळी दरम्यान कारवाई केलेल्या फटाक्यांचा माल सिल करुन ठेवला होता. या गोदामात विजेची जोडणी देखील नसल्याने ही आग कशामुळे याबाबत शोध सुरु आहे. सदर माल सुमोर 40 हजार रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. अलिबाग नगरपरिषद, तसेच आरसीएफ थळ येथील अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन सदर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी वा दगावलेला नाही.

तालुक्यातील फटाके विक्रेते शिंदे यांच्या गोदामामध्ये दिवाळीच्या कालावधीत सुतळी बॉम्ब पोयनाड पोलिसांनी जप्त केले होते. गेल्या अडीच महिन्यापासून हा नाशवंत साठा गोदामातच पडून होता. शनिवारी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास अचानक गोदामामधून आवाज आला. आगीचा भडका उडू लागला होता. गोदामाच्या परिसरात असलेल्या गवतानेदेखील पेट घेतला. परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने एकत्र येत आपआपल्या परिने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीचा भडका वाढत गेला. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग नगरपरिषद कंपनीचे अग्निशमन दलाचे पथक दोन अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तीन वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर आरसीएफ थळ येथील अग्निशमन दलाने देखील आग विझवण्यास प्रयत्न केले. अखेर तब्बल पाऊण तासानंतर आग आटोक्यात आणण्यास या यंत्रणेला यश आले. या आगीमध्ये सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे नाशवंत फटाके जळून खाक झाले आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याचा तपास सुरु असल्याची माहिती पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे यांनी दिली.

Exit mobile version