कंपनी कामगारांकडूनच अवघ्या मिनिटातच आग आटोक्यात
| महाड | प्रतिनिधी |
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही स्पेशालिटी केमिकल लिमिटेड या कारखान्याच्या रिसर्च विभागाच्या टेरेसवर किरकोळ आग लागली. आग विझवताना काळा धूर अवकाशात दिसू लागल्याने कंपनी परिसरातील नागरिक भयभीत झाले. मात्र, कंपनी कामगारांनी त्यांचे कौशल्य दाखवत आग अवघ्या काही मिनिटातच आटोक्यात आणली.
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कंपनीचा दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी हजारो कामगार काम करीत आहे. प्रीव्ही कंपनीमध्ये यापूर्वी सन 2018 रोजी मोठी आग लागली होती. या आगीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, या आगीच्या घटनेतून कंपनीने आपली अग्निशमन यंत्रणा अधिक प्रबळ केली. या यंत्रणेनेच आज लागलेली आग अवघ्या काही क्षणातच आटोक्यात आणली. सकाळी कंपनीच्या रिसर्च विभागाच्या टेरेसवर धूर दिसून आला. धुराचा लोट अवकाशात दिसताच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक, पादचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कंपनीमधील कामगारांनी अवघ्या काही मिनिटातच आग आटोक्यात आणली. कंपनीमध्ये बसवलेल्या अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेच्या बळावर आणि कामगारांच्या कौशल्याने प्रीव्ही कंपनीमधील आग आटोक्यात आणली असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बी. पठारे यांनी दूरध्वनी वरून दिली.