| पनवेल | प्रतिनिधी ।
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला आग लागण्याची घटना गुरुवारी ( ता.8 ) सायंकाळी घडली आहे. औद्योगिक वसाहतीमधील भूखंड क्रमांक 103 वर असलेल्या मोदी केम या कारखान्यात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तळोजा औद्योगिक वसाहती मधील अग्निशमन दल, कळंबोली अग्निशमन दल, तसेच पनवेल अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिनी दिली.प्रत्यक्ष दर्शिनी दिलेल्या माहिती नुसार कारखान्यात रसायनांनी भरलेले ड्रम असल्यामुळे आगीची झळ बसल्याने कारखान्यातून लहान मोठ्या स्पोटांचे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महत्वाचे म्हणजे गुरुवारी सायंकाळ पासूनच परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून देखील आग नियंत्रणात येत नसल्याने कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आगीत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित हाणी झालेली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.







