। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील महावीर पेठ मध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत आयटी सर्वर जळाला असून, तीन कॉम्प्युटर, टेबल फॅन, प्रिंटर जळाले असून एका टेबलवरील काही कागदपत्रे जळाली आहेत. कर्जत नगरपरिषदेची अग्निशमन बंब लगेचच तेथे पोहोचल्याने आग विझविण्यात आली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.7) पहाटे साडेचारच्या सुमारास बँकेच्या शाखेला आग लागली. सहाच्या सुमारास बँकेच्या इमारतीतून धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. शाखा व्यवस्थापक गजेंद्र घाडगे, नुकतेच निवृत्त झालेले स्पेशल असिस्टंट दिलीप बडेकर, जयवंत बडेकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर आगीचा भडका झाला. त्यांनी लगेचच अग्निशमन दलाशी संपर्क केला. अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे यांनी आग विझवली. डिपार्टमेंट मॅनेजर विनीत जाधव, सुरक्षा दलाचे अधिकारी अभिजीत पठारे हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. या आगीत आयटी सर्वर जळाला असून तीन कॉम्प्युटर, छोटा टेबल फॅन, एक प्रिंटर आणि एका टेबलवरील काही कागदपत्रे जळाली आहेत. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उद्या सोमवार आहे. बँकेचे कामकाज सुरु करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती शाखा व्यवस्थापक गजेंद्र घाडगे यांनी केली आहे.







