महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये अग्नितांडव

लाखो रुपयांचे नुकसान

| सुकेळी | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील नागोठण्याजवळील असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील कानसई येथील 400 केव्ही क्षमता असलेल्या सबस्टेशनमध्ये आग लागल्याचा प्रकार घडला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे सबस्टेशनमध्ये अग्नितांडव पाहावयास मिळाले. ही घटना मंगळवारी (दि.14) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत सबस्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, नागोठणेजवळील कानसई येथील महापारेषणच्या 400 केव्ही सबस्टेशनमध्ये मंगळवारी अचानक आग लागल्याचे येथील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. कर्मचार्‍यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग इतकी भयंकर होती की काही क्षणार्धातच आगीने रौद्ररूप धारण केले. तात्काळ सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर काही वेळातच आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेम, नागोठणे येथील रिलायन्स तसेच धाटाव एमआयडीसी यांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या कर्मचार्‍यांसह दाखल झाल्या. या चारही कंपनीच्या अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी कानसई सबस्टेशनमधील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Exit mobile version