| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील बावन्न बंगला विभागातील सुशील गार्डनच्या मागील बाजूस असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील गार्डनच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी धूर आणि ज्वाळा दिसताच तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित विभागाकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आग लागल्यामुळे काही काळ परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई केल्यामुळे आग जवळील घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला.







