साखरपा-जाधववाडीत धावत्या बसला आग

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. मिऱ्या-नागपूर महामार्गावरील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर खाजगी बसला अचानक भीषण आग लागली.

पुण्याहून सुमारे 30 प्रवाशांना घेऊन ही बस रत्नागिरीच्या दिशेने निघाली होती. पहाटे सुमारे साडे तीन वाजण्याच्या सुमारास बस गद्रे पेट्रोल पंपाजवळ पोहोचताच चालकाच्या लक्षात आले की बसला आग लागली आहे. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच देवरूख नगरपंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान, साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस मनस्वी पावसकर आणि चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवत प्रवाशांना आवश्यक मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version