मुरूडमध्ये दोन घरांमध्ये आग

हजारो रुपयांचे नुकसान

| आगरदंडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत भागातील खारीकवाडा परिसरात सोमवारी (दि.12) सकाळी 10 वाजता आग लागल्याने दोन घरांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

खारीकवाडा परिसरातील रमेश पाटील यांच्या पत्नी मंदा पाटील यांनी सकाळी घरातील देवासमोर दिवा लावून परिसरातील मंदिरात गेल्या होत्या. यादरम्यान, सकाळी दहा वाजता दिव्याची आग वाढत जाऊन ती छप्पर पर्यंत पोहचली. या आगीचा भडका उठून रमेश पाटील यांच्या घरालगत असणाऱ्या प्रभाकर पाटील यांच्या घराला देखील आग लागली. यावेळी दोन्ही घरातील माणसे बाहेर असल्याने ही बाब पटकन लक्षात आली नाही. परंतु, कौलातून धूर येऊ लागल्याने असंख्य मदतीचे हात धावून आले. यावेळी आगरी समाज खारीकवाडा, परीट समाज, मुस्लिम समाज तसेच श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर येथील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सुद्धा आग विझविण्यासाठी धावून आले. त्यांनी तातडीने दखल घेतल्याने ही आग आटोक्यात आली. यादरम्यान, मुरुड नगरपरिषद अग्निशामक दल देखील घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, त्या आधीच आग विझविण्यात आली होती. या आगीमध्ये कपडे, भांडी, महत्वाची कागदपत्रे व लाकडी कपाटे जळून खाक झाली आहेत.

Exit mobile version