| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील शिघ्रे येथील रहिवासी असणारे नथुराम जानु माळी यांच्या घराच्या वरचा मजल्यावर वीज पडून लाखो रुपयांच नुकसान झाले. ही आग विझविण्यात मुरुड नगरपरिषदेच्या फायर ब्रिगेडला यश आले आहे.

मुरुड शहरासह पंचक्रोशी भागात सोमवारी रात्री 11 वाजल्यापासून मेघगर्जनेसह विजा चकमक होत्या. त्यातील एक वीज पहाटेच्या 3.30 वा. माळी यांच्या घराच्या वरचा मजल्यावर पडून घरातील आतील किंमती सामान आगीत भस्मसात झाले. त्यावेळी खालच्या भागात नथुराम माळी, त्यांच्या पत्नी प्रेमा माळी व त्यांचा मुलगा साहिल माळी हे होळीचा उत्सव आटोपून घरी झोपले होते. झोपेत असताना अचानक जास्त गरम होऊ लागल्याने घराच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांना घराच्या वरच्या बाजूला आग लागलेली दिसून आली. ही आग क्षणात वाढत गेल्याने त्यांनी आरडाओरड सुरु केला. त्यामुळे रहिवासी धावून आले. या आगीमुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. आग आटोक्यात येत नसल्यामुळे माजी नगरसेवक प्रमोद फायदे यांनी मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांना फोन करून शिघ्रे येथे घराला आग लागल्याची कल्पना दिली. वेळ न लावता ताबडतोब नगरपरिषदेचा अग्निशमन वाहन चालक अभिजित कारभारी, त्यांचे सहकारी मितेश माळी व अविनाश अवघडे यांनी घटनास्थळी येऊन लागलेली आग आटोक्यात आणली. वेळेत बंबची गाडी आली नसती तर आग वाढत गेली असती आणि आजूबाजुची घरांनाही ही आग लागली असती. या आगीत मोलमजुरी करणारे नथुराम माळी यांच लाखो रुपयांच नुकसान झाले आहे.
ही घटना कळताच तहसीलदार रोहन शिंदे यांनी शिघ्रे मंडल अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी पाचारण करुन नुकसानीची पाहणी करण्यास सांगितले. त्यावेळी तलाठी रेश्मा मसाल हे घटनास्थळी दाखल होऊन आगीत काय काय नुकसान झाले त्याची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर तलाठी रेश्मा मसाल यांनी 4 लाख 64,400 रुपये नुकसान झाले याची माहिती घरमालक नथुराम माळी यांना देण्यात आली. आजिम महाडकर बिरवडकर, सरपंच संतोष पाटील, मुकेश नाक्ती, शांताराम अरकाशी, जनार्दन मांदाडकर, संतोष माळी, शैलेश पाटील, कौशिक माळी, सुनिल पाटील, काशिनाथ पाटील, श्रीनाथ मांदडकर, महादेव माळी , इत्यादीनी देखील या प्रसंगी बहुमोल मदत केली. आग विझविण्या करिता ग्रामस्थ महिला-पुरुष तसेच पोलिस प्रशासन व नगरपरिषदेने सहकार्य लाभल्याने ही आग आटोक्यात आली आणि माझे माझ्या परिवारिचे जीव वाचले, अशी प्रतिक्रिया नथुराम माळी यांनी दिली. सेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ यांनी माळी यांना 50 हजाराची तात्काळ मदत दिली.
तहसिलदार गेले कुठे
शिघ्रे येथील रहिवासी असणारे नथुराम जानु यांच्या घरावर वीज कोसळून मोठी आग लागली. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे शेकाप नेते पंडित पाटील यांनी म्हटले आहे. वास्तविक या घटनेची तहसिलदार, प्रांतांनी गंभीर दखल घेऊन पाहणी करणे अपेक्षित होते. पण त्यांनी तलाठ्यामार्फत चौकशी करुन पंचनामे पूर्ण केलेले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. तातडीने माळी यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही पंडित पाटील यांनी केली.