पुठ्ठे व प्लास्टिकच्या मोठ्या गोदामाला आग

| दोडामार्ग | वृत्तसंस्था |

दोडामार्ग-गावडेवाडी येथे असलेल्या पुठ्ठे व प्लास्टिकच्या मोठ्या गोदामाला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 22) पहाटे 5.30 वा.च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक बंब दाखल झाला व आगीवर नियंत्रण मिळवले. दुर्घटनेत सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे गोदाम लोकवस्तीपासून दूर असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

दोडामार्ग बाजारपेठेलगत असलेल्या गावडेवाडी येथे पश्चिम बंगाल येथील गयापाल कश्यप यांचे पुठ्ठे, प्लास्टिक, बाटल्या, रद्दी पेपर, तसेच अन्य तत्सम वस्तूंचे मोठे गोदाम आहे. गयापाल कश्यप हे दोडामार्ग परिसरात पुठ्ठा, पुठ्ठेवाला म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोदामाला गुरुवारी पहाटे 5.30 वा.च्या सुमारास मोठी आग लागली. आगीचे मोठे लोंढे व धूर येऊ लागले. आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यानंतर पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत 18 हजार रुपयाचा वजन काटा, 70 हजार रुपये किंमतीची पुठ्ठे प्रेस मशीन तसेच अन्य साहित्य भस्मसात झाले. एकूण 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लगत असलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा मोठा साठा यातून बचावला आहे.

Exit mobile version