10 जहाजे बुडाली, 16 पेटली
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हाँगकाँगच्या टायफून बंदरात उभ्या असलेल्या 16 जहाजांना रविवारी पहाटे एकापाठोपाठ एक असे आगीने घेरले. या दुर्घटनेत 10 जहाजे पाण्यात बुडाली. तसेच एक व्यक्ती दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अग्नितांडवात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीय. सुमारे साडेसहा तासांच्या प्रदीर्घ झुंजीनंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले.
हाँगकाँगच्या व्यस्त आणि लगबग असलेल्या टायफून बंदरात रात्री 2.30 च्या सुमारास आग लागली. या आगीनं बघता बघता रौद्र रूप धारण करत 16 जहाजांना आपल्या कवेत घेतले. सुमारे साडेसहा तास ही आग धुमसत राहिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत 16 जहाजांचे नुकसान झालं आहे. आग आटोक्यात आली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी जहाजांवरील 35 जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.